भुषा (खर्डी) येथे 80 फूट खोल दरीत अडकलेल्या युवकास सुखरुप बाहेर काढण्यात पोलीसांना आले यश…

दिनांक-०३/०५/२०२३, नंदुरबार

दिनांक 02/05/2023 रोजी धडगाव पोलीस ठाणे हद्दीतील भूषा (खर्डी) येथे एका डोंगर दरीच्या कपारात एक इसम अवघड जागेवर अडकून पडल्याची माहिती नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी.आर.पाटील यांना मिळून आली. त्या अनुषंगाने सदर माहिती त्यांनी धडगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांना देवून दरीत अडकलेल्या युवकास तात्काळ सुखरूप बाहेर काढून योग्य त्या उपाययोजना करणेबाबत आदेशीत केले.

त्यावरून धडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. इशामोद्दीन पठाण यांनी पोलीस उप निरीक्षक श्री. राहुल पाटील व त्यांचे सोबत पोलीस नाईक कालूसिंग पाडवी, पोलीस अंमलदार जानसिंग वळवी असे तात्काळ घटनास्थळी रवाना केले. सदर पथकाने घटनास्थळी जावून खात्री केली असता त्यांना भूषा (खर्डी) येथे एक युवक दरीत अडकलेला असल्याचे समजून आले. परंतू दरी खोल असल्यामुळे त्याठिकाणी जाणे शक्य नव्हते. म्हणून धडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक इशामोद्दीन पठाण यांनी तात्काळ तहसिलदार, धडगाव यांचेशी संपर्क करून धुळे येथील SDRF पथक यांना धडगाव येथे येण्याबाबत सूचीत केले. परंतू SDRF पथक हे रात्री उशीरा येणार असलेबाबत पोलीस ठाणेचे अधिकारी यांना कळल्याने पोलीसांपुढे अडकलेल्या युवकास सुखरूप कसे बाहेर काढावे ? याचे मोठे आव्हान होते.

पोलीसांनी तात्काळ वनविभागाचे अधिकाऱ्यांशी समन्वय साधून वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांना मदतीसाठी बोलावून घेतले. त्यानंतर वन विभागाच्या अधिकारी व कर्मचारींनी मिळून युवकास बाहेर काढण्याचे प्रयत्न केले परंतू अंधार असल्यामुळे पथकाला बचावकार्य करण्यात प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत होते. तरी देखील धडगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार हे तेथील गावकऱ्यांसोबत मिळून युवकास बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते.

दि.03/05/2023 रोजी पहाटे धडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक श्री. राहुल पाटील व त्यांचे सोबत अंमलदार, गावकरी असे दरीत उतरले व अडकलेल्या युवकास शोधण्याची मोहिम पुन्हा सुरू केली. परंतू तरी देखील तो मिळून येत नव्हता. धडगाव पोलीसांनी त्यांचे प्रयत्न न थांबविता अजून खोल दरीत उतरून अडकलेल्या युवकाचा शोध घेतला असता सदर युवक हा नर्मदा नदी किनारी दरीत अवघड जागेवर अडकून पडलेला असल्याचे दिसून आला. त्यानंतर धडगाव पोलीसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने अथक प्रयत्न करून दोरीच्या सहाय्याने दरीत अडकलेल्या युवकास सुखरूप बाहेर काढले.

सदर युवकास बाहेर काढल्यानंतर त्याचेवर प्राथमिक उपचार केले. त्यानंतर पोलीस उप निरीक्षक राहुल पाटील यांनी सदर युवकास विश्वासात घेवून त्याचे नाव गाव बाबत विचारणा केली असता त्याने त्याचे नाव संजय देवसिंग मुजालदे, राहणार मुतरकुन्ड, ता.तापी, जि.बडवाणी (मध्यप्रदेश) असे असल्याचे सांगितल्याने त्याच्या गावातील पोलीस पाटील यांच्याशी संपर्क करून सदर युवकाचे काका संजय मुजालदे यांच्या ताब्यात देण्यात आले. दरीत अडकलेल्या युवकास सुखरूप बाहेर काढून त्याच्या कुटुंबियाच्या ताब्यात दिल्यानंतर त्यांनी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे कौतूक करून आभार व्यक्त केले.

सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. श्रीकांत घुमरे यांचे मार्गदर्शनाखाली धडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. इशामोद्दीन पठाण, पोलीस उप निरीक्षक श्री. राहुल पाटील, पोलीस हवालदार स्वप्नील गोसावी, पोलीस नाईक कालूसिंग पाडवी, पोलीस अंमलदार जानसिंग वळवी, समाधान केंद्रे, उदेसिंग तडवी अशांनी केली आहे.